Join us

पारंपरिक जत्रोत्सवात रंगली प्रभादेवी!

By admin | Published: January 24, 2017 6:12 AM

तत्कालीन मुंबई बेटावरच्या जुन्या परंपरा आजही काही ठिकाणी जपल्या जात असल्या, तरी मुंबापुरीत जोशात रंगणाऱ्या विविध

मुंबई : तत्कालीन मुंबई बेटावरच्या जुन्या परंपरा आजही काही ठिकाणी जपल्या जात असल्या, तरी मुंबापुरीत जोशात रंगणाऱ्या विविध जत्रोत्सवांवर मात्र पडदा पडत चालला आहे. पण अशा स्थितीतही प्रभादेवीची जत्रा याला अपवाद ठरली आहे. सध्याच्या काळातही ही जत्रा आपले अस्तित्व टिकवून आहे. याच परंपरेची जपणूक करत प्रभादेवी मंदिराच्या परिसरात शाकंभरी पौर्णिमेपासून प्रारंभ झालेला प्रभादेवीच्या जत्रोत्सवाची सांगता नुकतीच झाली.ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला ‘प्रभादेवी’ हे नाव पडले, त्या ‘प्रभावती’ देवीच्या जत्रोत्सवाचा मोठा उत्साह या परिसरात दिसून येत आहे. उत्सवाच्या काळात प्रभादेवीचे मंदिर रोशणाईने झळाळून निघाले असून, मंदिर परिसरात मिठाई, फुले, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची अनेक दुकाने थाटण्यात आली होती. यात या उत्सवाची खासियत असलेला खाजा, पेठा, हलवा आदी जिन्नसांच्या दुकानांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. तर बच्चेमंडळी आकाशपाळण्यांची सैर करण्याचा आनंद लुटला. श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू प्रभादेवी मार्गावर प्रभादेवीचे पुरातन मंदिर आहे. प्रभावती देवीसह चंडिका व कालिकादेवीचेही या मंदिरात स्थान आहे. त्यामुळे या तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना इथे मिळते. तसेच प्रभावती देवी ही अनेक ज्ञातींची कुलदेवता असल्याने येथे भाविकांची मोठी रीघ असते. या जत्रेच्या निमित्ताने मुंबईच्या रूढी, परंपरेचे दर्शन समस्त मुंबईकरांना नव्याने होत आहे. (प्रतिनिधी)