प्रभादेवीची जत्रा जपतेय जुन्या मुंबईचा ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:32 AM2019-01-22T01:32:10+5:302019-01-22T01:32:17+5:30

तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्या.

Prabhadevi's flats keep the old Mumbai in place | प्रभादेवीची जत्रा जपतेय जुन्या मुंबईचा ठेवा

प्रभादेवीची जत्रा जपतेय जुन्या मुंबईचा ठेवा

Next

- राज चिंचणकर 
मुंबई : तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्या. सद्य:स्थितीत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत यातल्या काही जत्रा मुंबईत उरल्या आहेत. त्यातलीच एक जत्रा म्हणजे प्रभादेवीची जत्रा! हीच जत्रा सध्या प्रभादेवी मंदिराच्या परिसरात रंगली असून, पारंपरिकतेची कास धरत हा जत्रोत्सव जुन्या मुंबईचा ठेवा जपत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईच्या प्रभादेवी परिसराला ज्या देवीच्या नावावरून ‘प्रभादेवी’ हे नाव पडले, त्या ‘प्रभावती’ देवीचा हा जत्रोत्सव आहे. आता तर येथून नजीकच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकालाही ‘प्रभादेवी’ स्थानक म्हणून नाव दिले गेले आहे. प्रभावती देवी ही अनेक ज्ञाती-समाजांची कुलदेवता असल्याने, समाजाच्या विविध स्तरांतून तिच्या दर्शनासाठी भक्तगण येथे येत असतात. जत्रेच्या दिवसांत तर भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. पौष महिन्यातल्या शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर, सोमवारी या जत्रेला प्रारंभ झाला असून २९ जानेवारीपर्यंत यंदाचा हा जत्रोत्सव सुरू राहणार आहे.
प्रभादेवी परिसरातल्या प्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू प्रभादेवी मार्गावर प्रभादेवीचे मंदिर वसले आहे. या मंदिरात स्थानापन्न असलेली प्रभावती देवी ही समाजातील अनेक ज्ञातींची कुलदेवता असल्याने, समाजाच्या विविध स्तरांतून तिच्या दर्शनास भाविकांची गर्दी लोटते. या मंदिरात प्रभावती देवीसह चंडिका व कालिकादेवीचेही स्थान असल्याने, या तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना लाभते.
>या जत्रेच्या निमित्ताने सध्या या मार्गावर मिठाई, पेठा, हलवा, खाजा असे जिन्नस; तसेच खेळणी, इतर खाद्यपदार्थ, हार, फुले, प्रसाद आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. या जत्रेचे वैशिष्ट्य असलेला खाजा घेण्यासाठी भाविकांची दाटी होत आहे. मुलांसाठी आकर्षणाचा भाग असलेले आकाशपाळणेही गर्दी खेचत आहेत. रोज दुपारपासून रात्रीपर्यंत हा परिसर जत्रोत्सवात रंगत जातो. वर्षभर शांततेत आपले अस्तित्व जपत उभे असलेले प्रभादेवीचे मंदिर या जत्रेमुळे सध्या गजबजले आहे.
>इतिहासाची चाळता पाने...
१२ व्या शतकात त्या वेळच्या मुंबई बेटावर राज्य करणाऱ्या राजा बिंब याची ‘प्रभावती’ देवी ही कुलस्वामिनी! राजा बिंबने त्याचे प्रधान गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता श्री कालिका देवी आणि पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता श्री चंडिका देवी यांचीही प्रभावती देवीसह येथे स्थापना केली. त्या काळच्या परकीय आक्रमणांमुळे प्रभावती देवीची मूर्ती माहीमच्या खाडीत लपवण्यात आली होती.
तिथून ती नंतर सध्याच्या प्रभादेवी परिसरातील विहिरीत हलवण्यात आली. सन १७१४ मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीतील श्याम नायक यांनी ही मूर्ती त्या विहिरीतून बाहेर काढून तिथे मंदिर उभारले. कालांतराने पाठारे प्रभू समाजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हा इतिहास कथन करणारा शिलालेख आजही या मंदिरात दृष्टीस पडतो.

Web Title: Prabhadevi's flats keep the old Mumbai in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.