लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर शिंदेसेनेचे प्रभाकर उर्फ प्रभू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती पदावर हुकूमचंद आमधरे यांची नियुक्ती केली असून, दोन्ही पदांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शासनाच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांना उमेदवार निश्चितीची चिठ्ठी देण्याचे अधिकार देण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात दोन वाजता प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली. सभापती पदासाठी शिंदेसेनेचे प्रभाकर उर्फ प्रभू पाटील व उपसभापती पदासाठी नागपूर महसूल विभागातील हुकूमचंद आमधरे यांनी अर्ज भरला.
विरोधात एकही अर्ज नाहीविरोधात कोणीही अर्ज न भरल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. संचालक मंडळाचा कार्यकाळ सहा महिने शिल्लक आहे. यामुळे सर्व संचालकांनी बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला.
बाजार समितीमधील कांदा मार्केटची पुनर्बांधणी व व्यापार वाढविण्यासाठी आवश्यक ते निर्णय गतीने घेण्यात येतील. सर्वांना विश्वासात घेऊन बाजार समितीमधील सर्व प्रश्न वेगाने सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.प्रभू पाटील, सभापती
बाजार समितीमधील सर्व संचालकांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून पुढील काळात अधिक चांगले काम करण्यास प्राधान्य देणार आहोत.हुकूमचंद आमधरे, उपसभापती