प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय, पूनम महाजनांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 07:44 PM2019-01-17T19:44:59+5:302019-01-17T19:45:18+5:30
भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्रांसंदर्भात एक विधान केलं आहे.
मुंबईः भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्रांसंदर्भात एक विधान केलं आहे. यावेळी त्यांनी भगवान प्रभू रामचंद्र हे उत्तर भारतीय असल्याचं म्हटलं आहे. प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हे विधान केलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं फार जुनं आहे. पूनम महाजन यांनी प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्याचा हवाला दिल्यानं उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसेनंही उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात आता भाजपा खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्यानं सांगितल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होते आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे राम मंदिरासाठी अध्यादेश न काढता कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मागील काही काळापासून संघ आणि विहिंपनंही राम मंदिरासाठी मोदी सरकारनं अध्यादेश काढावा, अशी मागणी केली होती. अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले होती. राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका मुलाखतीत दिल्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर नव्याने प्रतिक्रिया येत आहेत. मंदिरासाठी कायदा बनवा, अशी मागणी यानिमित्ताने विहिंपने पुन्हा एकदा केली होती.