मनोहर कुंभेजकर
मुंबई : सध्या मुंबईसह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी 7 नोव्हेंबर 2004 रोजी या रक्तपेढीचे उदघाटन केले होते. तर 10 ऑक्टोबर 2008 रोजी प्रबोधन थँलेसेमिया सेंटरचे उदघाटन करण्यात आले. गेल्या 15 वर्षात या रक्तपेढीने 1586 रक्तदान शिबीरांचे आयोजन करून 1,21,707 रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. वर्षाचे 365 दिवस व 24× 7 सुरू असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झालेली ही प्रबोधन गोरेगावची मीनाताई ठाकरे रक्तपेढी ठरते कोरोना रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.
पश्चिम उपनगरात एक आदर्श रक्तपेढी म्हणून नावलौकीक असलेली आणि राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई हे या रक्तपेढीचे संस्थापक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वीच 24× 7 सुरू असलेली प्रबोधन गोरेगावची मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोरोना रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.या रक्तपेढीचे प्रकल्प प्रमुख रमेश इस्वलकर यांनी लोकमतला ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24× 7 सुरू असलेल्या या रक्तपिढीला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या लॉकडाऊनच्या कालावधीत 10 पेक्षा जास्त रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून 450 पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.त्यामुळे सध्याच्या आपत्कालीन कोरोनजन्य परिस्थितीत पुरेसा रक्तसाठा या रक्तपेढीत सध्यातरी उपलब्ध असल्याची माहिती रमेश इस्वलकर यांनी दिली.
कोरोनचे गांभीर्य ओळखून व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य तरे,टेक्निकल सुपरवायझर मनीषा बनसुडे, सरिता भारद्वाज आणि तंत्रज्ञ सचिन निनावे,रुपेश हीलिम, सुरेखा कापदुले,अश्विनी चव्हाण,जयश्री पवार, कीर्ती मोरे, सिद्धार्थ कांबळे , मदतनीस अनिकेत बोरले,ऋतिक फळे यांनी रात्रंदिवस सेवा देवून रक्तपेढी २४x७ कार्यरत ठेवली. विशेष म्हणजे लॉक डाऊन असल्याने व रक्तपेढीचे काम २४x७ सुरू राहण्यासाठी येथील सर्व महिला कर्मचाऱ्यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाटकर कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली असल्याचे रमेश इस्वलकर यांनी शेवटी सांगितले.