प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दिव्यागांसाठी सुविधांचा अभाव;महानगरपालिकेने दखल घेण्याची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: November 10, 2023 05:19 PM2023-11-10T17:19:19+5:302023-11-10T17:21:22+5:30
महानगरपालिकेने दखल घेण्याची मागणी अभिनव वसंत सोसायटीत राहणाऱ्या वसंत संखे यांनी केली आहे.
मुंबई:बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये दिव्यांगांचा अजिबात विचार केलेला नाही. तिथे व्हीलचेअर नेणे एकट्या अपंगाला तर शक्यच नाही. तीव्र स्वरूपाच्या दिव्यांगाना येथे प्रवेश जवळजवळ निषेधच आहे. शासन दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना करत आहेत असे घोषणा करत राहते, महानगरपालिकेकडे आर्थिक कमतरता नसतानाही अशा महत्त्वाच्या विषयावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
आपण स्वतः 90% हून अधिक अपंग असलेला एक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहे. शासनाच्या उपसचिव पदावरून महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळाचा पहिला व्यवस्थापक म्हणूनही नियुक्त झालो होतो, या क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे मला तीन वेळा राष्ट्रपती महोदयांकडून पुरस्कारही मिळालेला आहे, मात्र तेथील असुविधा व गोंधळ बघून मनस्वी दुःख झाले .त्यामुळे महानगरपालिकेने व संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी विनंती बोरिवली (प),अभिनव वसंत सोसायटीत राहणाऱ्या वसंत संखे यांनी केली आहे.
दि, 3 नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात मुंबई वासीय वंजारी सेवा संघाने समाजाच्या आर्थिक हातभरासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता . संघटनेतील धडपड्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मी स्वतः व्हीलचेअर असूनही कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. माझे अपंगत्व 90% पेक्षा अधिक आहे .नाट्यगृहात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर जाण्याची खास व्यवस्था केलेली आहे ,त्याची पडताळणी करावी आणि आपल्या समाजाच्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाज बांधवांना भेटावे म्हणून मी मोठ्या आशेने कार्यक्रमाला गेलो मात्र तिथे गेल्यावर फार मोठी फसगत झाली अशी माहिती वसंत संखे यांनी दिली.