Join us

अंतिम सत्रांच्या परीक्षांसाठी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:31 AM

सर्व विद्यापीठांनी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.

मुंबई : विद्यापीठांच्या अंतिम सत्रांसाठीच्या परीक्षांसाठी निकालासह संपूर्ण प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, तसेच सर्व विद्यापीठांनी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आॅनलाईनच्या माध्यमातून राज्यपालांनी राजभवनवर बैठक घेतली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनानुसार १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करून ३१ आॅक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसांत शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची, बहुपर्यायी प्रश्नासह स्वरूप किंवा अन्य काही याचा निर्णय विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी. मात्र, आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय केवळ अपवादात्मक परिस्थितीच घ्यावा, अशी सूचनाही राज्यपालांनी केली.३१ आॅक्टोबरपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्याची जबाबदारी कुलगुरू आणि विद्यापीठांची आहे. एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही अशाच सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न असेल, असे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :परीक्षाशिक्षण क्षेत्र