गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईअंधेरीच्या लोखंडवाला संकुलात चार जणांनी केलेल्या आत्महत्येच्या गुंतागुंतीचा उलगडा आता तपास अधिकारी करत आहेत. ज्यात या चारही जणांनी आत्महत्येचा सराव मनोज पटेल याच्या मोंटाना इमारतीमध्ये असलेल्या घरात केल्याचे उघड झाले आहे. तसेच आत्महत्येचा हा व्हिडीओ ज्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला, त्या मोबाइलची खरेदी महिनाभर आधी केल्याचेही या तपासातून समोर आले आहे. सोमनाथ पाल (२०), त्याची बहीण भारती (२५), आई शिख (४५) आणि तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज पटेल (५५) या चौघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना शिशिरा आणि मोंटाना इमारतीच्या खोल्यांमध्ये सापडले. या खोल्यांमध्ये पोलिसांनी पुन्हा सर्च आॅपरेशन केले. ज्यात मनोज राहत असलेल्या मोंटाना इमारतीच्या खोलीत पोलिसांना कपडे सुकविण्यासाठी लावलेले दोन हुक सापडले आहेत. या ठिकाणी केलेल्या सरावाचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले आहे. त्यांनी १५ जानेवारी रोजी मोबाइल विकत घेतल्याचा अंदाज घरात सापडलेल्या मोबाइलच्या बॉक्सवरून व्यक्त करण्यात येत आहे. मोबाइलच्या व्हिडीओ रेकॉर्डरवरून १५ फेब्रुवारी रोजी रेकॉर्ड करण्यात आलेला आत्महत्येचा व्हिडीओ प्रत्येकी एक मिनिटाचा असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
मोंटाना इमारतीत आत्महत्येचा सराव?
By admin | Published: February 25, 2015 3:53 AM