मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाशिकमधील आडगाव येथे उभारण्यात आलेल्या ४४८ सदनिकांपैकी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत भरलेल्या ६ लाभार्थ्यांना नुकताच सदनिकांचा ताबा देण्यात आला, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आडगाव येथील योजनेच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नाशिक मधील आडगाव येथे गट क्रमांक १५६० मध्ये राबविण्यात आलेल्या या योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ४४८ सदनिका व ३२ दुकानांची उभारणी करण्यात आली असून ३०६ सदनिकांची ताबा देण्याची कार्यवाही सुरु आहे. या सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून मागणी आजमावण्यासाठी जाहिरात देऊन अग्रीम अंशदान तत्वावर अर्ज मागविण्यात आले. ४४८ सदनिकांपैकी ३०८ सदनिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानास पात्र लाभार्थ्यांची केंद्र शासनाच्या पीएमवाय - एमआयएस या पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति सदनिका राज्य शासनाचे एक लाख रुपये व केंद्र शासनाचे दीड लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळणार असून सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ७ लाख ४० हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पार्किंग अधिक ७ मजल्यांच्या ४ इमारती बांधण्यात आल्या असून प्रत्येक इमारतीत १ बीएचके स्वरूपाच्या सदनिका असून तीन लिफ्ट, प्रशस्त सोसायटी कार्यालय, कव्हर्ड पार्किंग, सामायिक संरक्षक भिंत इ. सुविधा देण्यात आल्या आहेत. योजनेतील उर्वरित १४२ सदनिकांसाठी व ३२ दुकानांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमाला नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी किशोरकुमार काटवटे, कार्यकारी अभियंता श्री. केदारे यांच्यासह म्हाडा नाशिक मंडळातील अधिकारी - कर्मचारी आदी उपस्थित होते.