Join us

प्रधानमंत्री आवास योजना आता मुंबईतही, प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 6:28 AM

स्वत:चे घर घेणे परवडत नाही, अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी या योजनेंतर्गत अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी दरामध्ये परवडणारी घरे बांधून देण्यात येतात.

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) आता मुंबईतही राबविण्यात येणार आहे. पीएमएवाय योजनेचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये पीएमएवाय योजनेंतर्गत तीन हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रथमच या योजनेंतर्गत घरे बांधण्याचा मार्ग खुला झाला आहे.स्वत:चे घर घेणे परवडत नाही, अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी या योजनेंतर्गत अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी दरामध्ये परवडणारी घरे बांधून देण्यात येतात.मुंबईमध्ये घरांच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना हक्काचे घर घेणे अवघड झाले होते. मात्र, आता या योजनेमुळे सर्वसामान्यांना मुंबईमध्येही कमी दरामध्ये घर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्वांना हक्काची घरे देण्याची घोषणा केली आहे. २०१७ मध्ये या योजनेला सुरुवातही करण्यात आली. या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये ११ लाख घरे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या घरांपैकी सहा लाख घरांची बांधकामे सुरू आहेत, तर तीन लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता मुंबईतही अशा घरांची उभारणी होणार असल्याने मुंबईकरांचे लक्ष राज्य शासनाच्या अंतिम प्रस्ताव मंजुरीकडे लागले आहे.विकासकही तयारसध्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आहे. त्याचा परिणाम मुंबईसह मुंबई लगतच्या क्षेत्रातही होत आहे. यामुळे खासगी विकासकांची घरे तशीच विक्रीविना पडून आहेत. त्यामुळेच ही घरे पीएमएवाय अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी विकासकांनी तयारी दर्शविली असल्याने, या योजनेंतर्गत आणखी घरे निर्माण होणार आहेत.

टॅग्स :मुंबई