Join us

सिद्धिविनायकाला ‘महामोदका’चा प्रसाद

By admin | Published: September 12, 2016 3:38 AM

बाप्पाला आवडणारा पदार्थ म्हणजे ‘मोदक’. असाच माव्याचा तब्बल १० फुटांचा भव्य मोदक शनिवारी सिद्धिविनायक चरणी अर्पण करण्यात आला.

मुंबई: बाप्पाला आवडणारा पदार्थ म्हणजे ‘मोदक’. असाच माव्याचा तब्बल १० फुटांचा भव्य मोदक शनिवारी सिद्धिविनायक चरणी अर्पण करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात या मोदकाची स्वारी रवींद्र नाट्यमंदिर ते सिद्धिविनायक मंदिर अशी निघाली. औचित्य होते ते ‘महामोदक २०१६’ महोत्सवाचे. ‘लोकमत’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.‘एबीपी माझा’ आणि ‘लोकमत’ आयोजित ‘महामोदक २०१६’ या महोत्सवाचा सांगता सोहळा शनिवारी रवींद्र नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे आकर्षण ठरला तो म्हणजे तब्बल १० फुटांचा अस्सल माव्याचा मोदक. सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोदक बनविण्यात आला होता. शेफ आणि उपस्थित महिलांनी मिळून दूधापासून मावा बनविला आणि त्याला भव्य मोदकाचे रूप दिले. पारंपरिक मोदकासोबत हटके मोदकांच्या पाककृती शेफ विष्णू मनोहर यांनी करुन दाखविल्या. या मोदकाची मिरवणूक रवींद्र्र नाट्यमंदिर ते सिद्धिविनायक मंदिर अशी काढण्यात आली. साईराज ढोलपथकाने महामोदकाची ही मिरवणूक ढोल-ताशांच्या सादरीकरणाने दणाणून सोडली. दिवसभर चाललेल्या या महोत्सवासाठी अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी यांनी गणेश वंदना सादर केली तर अभिनेता सुयश टिळकने कलाकार बँडसोबत धमाकेदार सादरीकरण केले. मेघा संपत आणि डान्स ग्रुपने बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. या महोत्सवाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने केले.यावेळी लहानग्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला, मातीच्या वस्तू बनवणे, टॅटू बनविणे अशा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी होत चिमुकल्यांनी बाप्पांची विविध रूपे टॅटू, चित्राच्या माध्यमातून रेखाटली. तर मातीच्या वस्तू बनविणे स्पर्धेत बाप्पाच्या रंगीबेरंगी मूर्ती घडविण्यात आल्या. या सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. सिद्धीविनायक मंदिरातील संध्याकाळच्या आरतीनंतर हा महामोदक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला.(प्रतिनिधी)