Join us

प्रदीप शर्माची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:06 AM

वाझेसमोर बसवून चौकशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळील स्फोटक कार आणि ठाण्याचे ...

वाझेसमोर बसवून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळील स्फोटक कार आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माजी पोलीस निरीक्षक व वादग्रस्त चकमक फेम प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी चाैकशी झाली. दुपारी बारा वाजल्यापासून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविला जात होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला समोर बसवून त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते.

एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात बुधवारी शर्मा यांची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने त्यांना गुरुवाारी पुन्हा बाेलावण्यात आले. वाझे त्यांना २ व ३ मार्चला भेटला होता, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामागील कारण काय, हिरेन यांना तुम्ही कधीपासून ओळखत होता आणि निलंबित पाेलीस काॅन्स्टेबल विनायक शिंदे तुमच्या संपर्कात राहण्यामागील कारण काय, अशा विविध प्रकरणी त्यांच्याकडे कसून विचारणा करण्यात आल्याचे समजते. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने काही वेळा अधिकाऱ्यांनी वाझेला त्यांच्या समोर बसवून काही प्रश्नांची विचारणा केली.

* शर्मांकडून जिलेटीन कांड्यांचा पुरवठा?

अँटिलियाच्या परिसरातील स्काॅर्पिओत ठेवण्यात आलेल्या २० जिलेटीन कांड्या या प्रदीप शर्मा यांनी वाझेला पुरविल्या होत्या का, याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे. स्फोटक कार आणि त्यानंतरच्या मनसुख हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

* वाझेची पुन्हा जे.जे. रुग्णालयात तपासणी

सचिन वाझेची प्रकृती बिघडल्याने गुरुवारी त्याला सकाळी पुन्हा जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. मंगळवारी रात्री त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रुग्णालयात त्याची तपासणी करून विविध चाचण्या करण्यात आल्या. पुन्हा एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले.

---------------------