Join us

राज्यातील विवेकवाद संपतोय का?

By admin | Published: September 11, 2015 2:05 AM

गेल्या काही काळात महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरणात घडलेल्या आणि घडत असलेल्या काही आक्षेपार्ह घटनांनी व्यथित होऊन राज्यातील लेखकांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : गेल्या काही काळात महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरणात घडलेल्या आणि घडत असलेल्या काही आक्षेपार्ह घटनांनी व्यथित होऊन राज्यातील लेखकांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आवाहन करत ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आलेल्या धमकीचा निषेधही केला आहे. शिवाय, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी यंत्रणा कोणत्या निष्कर्षांना पोहोचल्या आहेत, याचे स्पष्टीकरणही लेखकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितले आहे.जयंत पवार, गणेश विसपुते, प्रवीण बांदेकर, नीरजा, श्रीकांत देशमुख, संजय पवार, संध्या नरे-पवार, संजय भास्कर जोशी, समर खडस, अजय कांडर, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, सतीश तांबे, प्रतिमा जोशी, मकरंद साठे, हेमंत दिवटे, शफाअत खान, वीरधवल परब, वर्जेश सोलंकी, प्रशांत बागड, महेंद्र कदम, कृष्णा किंबहुने आणि गोविंद काजरेकर यांनी हे पत्र लिहिले आहे. आपल्या विचारांहून वेगळा विचार करणाऱ्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी पद्धतशीरपणे भयाचे वातावरण विशिष्ट विचारसरणीच्या ठरावीक गटांकडून तयार केले जात आहे, असे लेखकांचे मत आहे. डॉ. नेमाडे यांना राज्याच्या गृहखात्याने त्वरित संरक्षण पुरवले आहे. ज्यांना जीवे मारण्याची धमकी येते त्यांना संरक्षण पुरवणे आणि जीविताची काळजी घेणे एवढेच शासनाचे काम आहे का, असा सवाल लेखकांनी या पत्राद्वारे उपस्थित केला आहे. लेखक, कलावंत, विचारवंत, भाष्यकार यांना आपल्या लेखनाची, कलेची, विचारांची मुक्तपणे अभिव्यक्ती करता येईल तसेच संपूर्ण समाज भयमुक्त राहील असे वातावरण समाजात निर्माण करणे हे महत्त्वाचे कर्तव्य आहे, हे जास्त महत्त्वाचे असून, शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणीही लेखकांनी केली आहे.