महाआघाडीत बिघाडीचे सूर!, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, कपिल पाटील असमाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:01 AM2018-12-27T06:01:18+5:302018-12-27T06:01:47+5:30
लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र असून या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सन्मानपूर्वक चर्चा केली जात नसल्याचा आरोप करीत महाआघाडीत न जाण्याचा इशारादेखील दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र असून या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सन्मानपूर्वक चर्चा केली जात नसल्याचा आरोप करीत महाआघाडीत न जाण्याचा इशारादेखील दिला आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर, खा. राजू शेट्टी आणि आ. कपिल पाटील हे तिघेही महाआघाडीबाबतच्या चर्चेविषयी समाधानी नाहीत. एकेक जागा घ्या आणि आमच्या प्रचाराला या, अशी भाषा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात असून आम्हाला गृहित धरले जात आहे. असे असेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी दिला. आंबेडकर यांनी वंचित आघाडीसाठी महाआघाडीत १२ लोकसभा जागा सोडण्याची मागणी केलेली आहे. त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने आधी भूमिका स्पष्ट करावी, असा टोला भारिप-बहुजन महासंघाने हाणला आहे.
खा. राजू शेट्टी, आ. कपिल पाटील हे दोघेही बुधवारी दिल्लीत होते. काँग्रेस आणि भाजपा या दोघांनाही पर्याय ठरू शकेल, अशी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू असून त्या दृष्टीने त्यांनी दिल्लीत काही गाठीभेटी घेतल्या. महाआघाडीमध्ये भारिप-बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, कम्युनिस्ट या पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडणार हे काहीही ठरलेले नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ४८ पैकी ४० जागांचे वाटप ठरल्याचे सांगत आहेत. तीन राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्यापासून तर त्यांनी आम्हाला अधिकच गृहित धरणे सुरू केले, असा आरोप कपिल पाटील यांनी लोकमतशी बोलताना केला.
महाआघाडीसाठी चर्चेच्या आणखी फेऱ्या होणार आहेत. आता काहीही अंतिम झालेले नाही आणि आमच्या पक्षातर्फे तसे कोणीही बोललेले नाही. त्यामुळे काँग्रेसने कुणाला गृहित धरण्याचा प्रश्नच नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी कपिल पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खुले पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती.
पाटलांचा बोलविता धनी मुख्यमंत्री
कपिल पाटील यांना महाआघाडीत येण्याविषयी काही आक्षेप असतील, तर ते त्यांनी चर्चेत मांडायला हवेत. त्याऐवजी ते पत्रकबाजी आणि ‘बाईट’बाजी करीत आहेत. त्यांचा बोलविता धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यांच्या इशाºयावरूनच पाटील बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.