Join us

जखमींसंबंधित विचारणा करताच प्रज्ञासिंग भावुक; मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 5:41 AM

विशेष न्यायालयाने मंगळवारी सीआरपीसी ३१३ अंतर्गत मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष एनआयएन न्यायालयाने विचारलेल्या बॉम्बस्फोटातील जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना  बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर भावुक झाली. 

विशेष न्यायालयाने मंगळवारी सीआरपीसी ३१३ अंतर्गत मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेत आरोपीला त्याच्या विरोधात असलेले पुरावे व परिस्थितीबाबत स्पष्टीकरण देण्याची संधी मिळते.  मालेगाव बॉम्बस्फोटानंतर जखमींवर उपचार करणाऱ्या व शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीशी संबंधित आरोपींना सुमारे ६० प्रश्न विचारण्यात आले.  या प्रश्नांना उत्तरे देताना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बसलेली प्रज्ञासिंग ठाकूर भावुक झाली. त्यामुळे न्यायालयानेही १० मिनिटे कामकाज थांबविले.

न्यायालयाने विचारलेल्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे तिने ‘मला माहीत नाही’ अशीच दिल्याची माहिती ठाकूरच्या वकिलांनी दिली. ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय,  अजय राहीरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर यूएपीए व भारतीय दंड संहितेअंतर्गत खटला सुरू असून मंगळवारी सातही आरोपी न्या. ए. के. लाहोटी यांच्यापुढे हजर होते. बुधवारीही आरोपींचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

२९ सप्टेंबर २००८ मालेगाव  बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.  सुरुवातील या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडे होता. जानेवारी २०११ मध्ये हा तपास एनआयएनकडे वर्ग करण्यात आला आहे.

३४ साक्षीदार फितूर

डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या खटल्यात ३२३ सरकारी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्या आहेत. तर, ३४ सरकारी साक्षीदार ‘फितूर’ झाले. साक्षीदारांची साक्ष संपल्यावर न्यायालयाने आरोपींचा जबाब नोंदविण्याचे कामकाज सुरू केले.