Join us

प्रज्ञासिंह ठाकूरला उपस्थित राहण्यापासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:14 AM

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिला मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिला मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्यास नियमित उपस्थित न राहण्याची सवलत दिली. सोमवारच्या सुनावणीस ठाकूर न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी तिने तब्येतीचे कारण देत आपल्याला न्यायालयात नियमित हजर राहता येणार नसल्याने तशी सवलत द्यावी, असा अर्ज विशेष न्यायालयात केला होता. विशेष न्यायालयाने मंगळवारी तिची विनंती मान्य केली.

ठाकूर हिला अनेक आजार असून, तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी मुंबईत असतानाही तिला कोकिलाबेन रुग्णालयात जाऊन काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या. तिच्या प्रकृतीत गुंतागुंत असून, डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर उपचार करणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे. तसेच ठाकूर भाजपची भोपाळची खासदार आहे आणि तिच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांनी तिच्याबरोबर सहा शस्त्रधारी पोलीस दिले आहेत. तसेच तिच्याबरोबर अन्यही सुरक्षारक्षक आहेत. या सर्वांबरोबर सतत प्रवास करणे अशक्य आहे, असे ठाकूर हिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

विशेष न्यायालयाने तिची बाजू ग्राह्य धरून तिला न्यायालयात नियमित उपस्थित न राहण्याची सवलत दिल्याची माहिती विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी दिली. मात्र, आवश्यक त्यावेळी तिला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे न्यायालयाने बजावले, असेही रसाळ यांनी सांगितले.