कमिशनसाठी प्रल्हाद मोदींचा हल्लाबोल
By admin | Published: April 29, 2015 01:55 AM2015-04-29T01:55:03+5:302015-04-29T01:55:03+5:30
अपुरे कमिशन आणि रेशनिंग कोट्यात केलेल्या कपातीमुळे रेशनिंग दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांप्रमाणेच रेशनिंग दुकानदारही आत्महत्या करतील,
मुंबई : अपुरे कमिशन आणि रेशनिंग कोट्यात केलेल्या कपातीमुळे रेशनिंग दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांप्रमाणेच रेशनिंग दुकानदारही आत्महत्या करतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ आणि अखिल भारतीय रेशन दुकानदार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे. गेल्या ५० वर्षांत दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबई रेशन दुकानदार संघटनेने १ मे रोजी सचिवालय आणि कोकण भवनसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय १ ते १० मेदरम्यान राज्यातील विविध भागांतील दुकानदार आत्मदहन करून सरकारला मागणी मान्य करण्यास भाग पाडतील. तसेच यासाठी प्रत्येक दुकानदाराने प्रतिज्ञापत्र केले असून, मृत्यूसाठी सरकारला जबाबदार धरले जाईल, अशी माहिती मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी दिली. डीलरशिप आणि रिटेलर्स असे दोन भाग करून रिटेलर्स शॉप हे रेशन दुकानदारांकडे द्यावे, जेणेकरून रेशन दुकानदारांना त्याचा फायदा मिळेल आणि अनुदानही वाचेल, असा मोदींनी दावा केला. (प्रतिनिधी)