मुंबई : ‘उत्तर भारतीय मुंबईची शान असून त्यांच्याअभावी ५० टक्के मुंबई बंद पडेल,’ असे वक्तव्य करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने महाजन यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.साकीनाका येथे साई-श्रद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय संमेलनादरम्यान महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. मनसेकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या की, भाषा आणि प्रांताच्या नावावर देशाचे विभाजन होता कामा नये. उत्तर भारतीय नागरिक मेहनती आहेत. जर उत्तर भारतीयांनी मुंबईची स्वप्ने पाहिली नाहीत, तर ५० टक्के मुंबई अशीच बंद पडेल. त्यामुळे त्यांच्या शक्तीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उत्तर भारताने देशाला मोठमोठे नेते दिले आहेत, हे विसरता कामा नये. याच उत्तर भारतात माझ्यासारख्या मराठी मुलीलाही भरपूर प्रेम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यावर मुंबई सांभाळण्यासाठी मराठी माणूस समर्थ असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.नांदगावकर म्हणाले की, मनसेचे आंदोलन हे उत्तर भारतीयांविरोधात नसून ते फेरीवाल्यांविरोधात आहे. ज्याचा त्रास प्रत्येक मुंबईकराला होत आहे. त्यामुळे मुंबई ही कोणावरही अवलंबून राहत नसल्याचे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे.पूनम महाजन राष्ट्रीय नेत्या झाल्यामुळे असे वक्तव्य करीत असाव्यात. मात्र त्यांचे वडील प्रमोद महाजन हे पंतप्रधान पदाचे दावेदार असतानाही, त्यांनी कधी असे वक्तव्य केले नसल्याचा टोलाही नांदगावकर यांनी लगावला आहे.उत्तर भारतीय मतांसाठी भाजपाची फिल्डिंगउत्तर भारतीय संमेलनात उदीत नारायण, दीपा नारायण, पवन सिंग, मनोज तिवारी अशा कलाकारांना आयोजकांनी आमंत्रित केले होते. संमेलनाचे आयोजक शुभ्रांशु दीक्षित यांनी मात्र उत्तर भारतीय लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन भविष्यात करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून सुरू असलेली ही मोर्चेबांधणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उत्तर भारतीय मुंबईची शान!, पूनम महाजनांची स्तुतिसुमने, मनसेकडून खरपूस समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:56 AM