मदतकार्याऐवजी मंत्र्यांसाठी हेलिकॉप्टरचा वापर, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:53 AM2019-08-13T05:53:39+5:302019-08-13T05:53:55+5:30
कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पूरग्रस्तांना स्थानिक जनतेनेच मदतीचा हात दिला. प्रशासनाने मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर मागितली, पण ती मंत्र्यांसाठी वापरली गेली.
मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पूरग्रस्तांना स्थानिक जनतेनेच मदतीचा हात दिला. प्रशासनाने मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर मागितली, पण ती मंत्र्यांसाठी वापरली गेली. सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना पाणी, औषधे मिळाली नाहीत. २००५ च्या पुराच्या वेळी ज्या पद्धतीने काँग्रेस सरकार जनतेशी वागली तसेच आताचे सरकार वर्तन करत आहे, असा अरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी राज्य सरकारचा निषेध केला.
कोल्हापूर आणि सांगलीमधील पुरासंदर्भात जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. ३० तारखेपासून पुराला सुरुवात झाली. सर्वच धरणांची दारे एकाच वेळी उघडण्यात आली. त्यामुळे पुढे हेच सर्व पाणी आलमट्टी धरणात अडवले गेले. अजूनही २ लाख २२ हजार जनावरे आणि तब्बल ७० हजार लोक पुरात अडकले आहेत. अद्याप पाणी ओसरलेले नाही. पुढील दहा दिवसांतील हवामानावर लक्ष केंद्रित करून काम करावे लागेल. राज्य सरकारने कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांशी संवाद साधून एक कंट्रोल रूम तयार करायला हवे. या चार राज्यांमध्ये समन्वय नसेल, एकमत झाले नाही तर फार मोठी हानी होण्याची शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.
संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि अर्धा सांगली पाण्याखाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर कोल्हापूरमध्ये मुक्काम केला असता आणि तिथून सूत्रे हलवली असती तर लवकर काम झाले असते. ज्या पद्धतीने केरळमध्ये त्यांच्या राज्यातील कोळी लोकांचा वापर करून पूरग्रस्तांची सुटका करण्यात आली तसा प्रयोग महाराष्ट्रातही करता आला असता. बोटींची संख्या मर्यादित आहे. लाइफगार्डच्या बोटीतून ११ तर नौदलाच्या बोटीतून केवळ सातजणांना वाचविणे शक्य आहे. अशा किमान शंभर बोटींची आवश्यकता होती. आताही अनेक धरणे भरलेली आहेत. भरलेली ही धरणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असे सांगतानाच नागरिकांनी अधिकाधिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. लहान मुले आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणार ब्लँकेटची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
‘त्या’ ईव्हीएमबाबत पोलीस तपास सुरू
सोलापुरात आमच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणारे दोन ट्रक पकडले आहेत. ईव्हीएम मशीन अशा पद्धतीने कुठे घेऊन चालले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस याचा तपास करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.