प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, ‘राजगृह’वरील हल्ल्यासह विविध विषयांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:48 AM2020-07-11T06:48:21+5:302020-07-11T06:48:51+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेल्या ‘राजगृह’ची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. ‘राजगृह’ या वास्तूवरील हल्ल्यासह विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेल्या ‘राजगृह’ची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. राजगृह हल्ला प्रकरणात योग्य तपास चालू असून पोलीस आपल्या संपर्कात असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीनंतर माध्यमांना सांगितले. कोळी, भोई या समाजाच्या मागण्यांबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचे असल्याचा मुद्दा त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे आंबेडकर म्हणाले. सध्या राज्यात लिलाव पद्धतीने मच्छीमारी ठेके दिले जात आहेत. ही लिलाव पद्धत बंद करून ते सर्व ठेके मच्छीमारांना थेट द्यावेत. मच्छीमारांच्या सहकारी संस्था आहेत, त्यांना मच्छीमारी करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. तसेच सुतार, कुंभार यांचे आयुष्य कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना बँका मदत करायला तयार नाहीत. कुंभार, सुतार यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना राज्य सरकारने ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. या अनुदानामुळे सरकारवर केवळ पंचवीस कोटींचा बोजा पडेल. मात्र, त्यातून राज्यातील सुमारे १७ लाख लोकसंख्या असलेला हा समाज स्वत:च्या पायावर उभा राहील, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, विकास दुबे प्रकरण चुकीच्या पद्धतीने झाले असून, त्याला टीप देणारे कोण वरिष्ठ अधिकारी होते हे आता समजणार नाही, ती लिंक पूर्णपणे तुटली आहे. ही चकमक काहींना वाचवण्यासाठी होती, असेही आंबेडकर म्हणाले.