Join us

'जनतेला एकमेकांविरोधात लढवण्याचं काम सुरूय'; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:07 PM

वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर संविधान सभा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई- वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर संविधान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे निमंत्रण काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकत नाही मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. या सभेला सुरुवात झाली आहे. दरम्यान सभेच्या सुरुवातील प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपल्या देशात आता आरक्षणाच्या नावाखाली समाजा समाजाला भिडवले जात आहे. एकमेकांच्या विरोधात लढवले जात आहे. आता ही परिस्थीती थांबवण्याच्याऐवजी त्यात खतपाणी घातले जात आहे. २००४ ला गोध्रा झाला, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मोठा गोंधळ झाला. आता भविष्यात देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आपल्या देशात भडकवणाऱ्या संघटना मोठ्या आहेत, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

" त्यांना सांगा आपल्या मुलाला या संघटनेत पाठवा, पण ते स्वत:च कुटुंब सुरक्षित ठेवत आहेत. दुसऱ्याला इजा करत आहेत. पण स्वत:ला करु घेत नाहीत अशी देशात अवस्था आहे. आता हळूहळू सत्ता जशी जात चालली आहे, तसे कार्यक्रमही बदलत आहेत. अशी परिस्थीती आहे. सगळ्याच गोष्टींचा वापर सुरू आहे. मी आज सकाळपासून किती ठिकाणी धाडी पडल्या हे पाहत होतो, सकाळपासून सात ठिकाणी धाडी पडल्या आहेत. देशात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात धाडी पडल्या आहेत, असंही आंबेडकर म्हणाले. 

राहुल गांधींंनी प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवले

राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, संविधान सन्मान सभेचे निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याचे आयोजन केले त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत. गेल्या ९ वर्षापासून घटनेच्या मुलभूत अधिकारांवर सातत्याने हल्ला होत आहे. आज देशात चिंताजनक स्थिती आहे. अशावेळी संविधानाचे संरक्षण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे मी आजच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलं. 

तर संविधान सन्मान सभेसाठी पाठवलेल्या निमंत्रणाला राहुल गांधींकडून उत्तर मिळाले. सध्या अन्य राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे त्यांना उपस्थित राहता येत नाही. परंतु काँग्रेस पक्षाकडून पर्यायी नावे सुचवली नाहीत. तरी तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला आणि काँग्रेसला निवडणुकीत यश मिळो अशा आमच्या शुभेच्छा आहेत असं वंचितने राहुल गांधींच्या पत्रावर म्हटलं आहे.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरभाजपा