Join us  

'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 4:46 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉर्न हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट जाण्यामागे दोन्ही सरकार जबाबदार आहेत. आता फक्त मेलेल्या मुडद्यावर रडण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. वेदांतावरुन राजकारण सुरु आहे. हा वाद विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उभा केला आहे. तुम्हाला याबाबत सर्व काही माहित होते, मग क्लोजर रिपोर्ट का दिला नाही?, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गुजरातला गेले होते. जिथे जिथे फडणवीस असतील तिथे-तिथे समस्या निर्माण होतात. भाजपा सत्तेत असताना अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. यात नवीन काही नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. 

दरम्यान, वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी मोदींनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मात्र सध्यातरी वेदांता प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची चौफेर कोंडी केली असून, त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता या वादातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात, हे पाठणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर-

दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलदेवेंद्र फडणवीसअजित पवारप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्र सरकार