मुंबई - वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, असं म्हणत लक्ष्मण मानेंनी खळबळ उडवून दिली आहे. मी प्रकाश आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असेही ते म्हणाले होते. याबाबत, प्रकाश आंबेडकरांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही. संघ आणि भाजपाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमध्ये घेतलंय. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि आरएसएसच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे, असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला होता. तसेच, वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असेही मानेंनी म्हटले होते.
तर मानेंच्या या आरोपावर बोलताना वंचितचे प्रदेश सरचिटणीस गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण मानेंना राष्ट्रवादीशी जोडले आहे. लक्ष्मण माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे. मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे. आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते या सगळ्याची उत्तर मी यापूर्वीच दिली आहेत. पक्षात येताना हा सगळा खुलासा करुन आलो आहे. महासचिवपदावर माझी निवड होणार याची कल्पनाही मला नव्हती. बैठकीत लक्ष्मण माने यांनीच नाव सुचवलं. मी त्यांना सांगितलं नव्हतं की माझे नाव पुढे करा. त्यामुळे लक्ष्मण माने यांना काही आक्षेप असतील तर ते अध्यक्षांकडे मांडावेत असेही पडळकर यांनी म्हटले आहे. त्यानंतर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
वंचित बहजन आघाडीत अनेक समाजातील घटकांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. या आघाडीत धनगर, माळी, बंजार यांसह अनेक जातींचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे थोडेसे वाद होणारच. लक्ष्मण माने हे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आघाडीत राहतील असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. पण, यापुढेही एकही शब्द न बोलता केवळ थँक्यू म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. त्यामुळे आता, लक्ष्मण माने नेमकी काय भूमिका घेतील ? हे येणार काळच ठरवेल.