‘भिडेंना २६ पर्यंत अटक करा; अन्यथा विधानभवनावर मोर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:12 AM2018-03-16T05:12:48+5:302018-03-16T05:12:48+5:30
कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढू,असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.
मुंबई : कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढू,असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.
भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे. मात्र संभाजी भिडे हे अजूनही मोकळे आहेत. सरकारने २६ मार्चपर्यंत त्यांना अटक केली नाही तर भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा आंबेडकर यांनीा दिला.२६ मार्च रोजी मुंबईतील भायखळा येथून या मोर्चाची सुरुवात होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.कपिल पाटील देखील उपस्थित होते.
भिडेंवरील कारवाईची विधान परिषदेत मागणी
कोरेगाव-भिमा घटनेसंदर्भात संभाजी भिडे यांच्यावरही कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, प्रकाश
गजभिये आणि विद्या चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी या बाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला.