मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांमध्ये दोनवेळेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता. त्यामुळे आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, अशी आठवण सांगत आंबेडकरांना आरसा दाखविण्याचे काम पवार यांनी केले.
अकोल्यात दोन निवडणुकांवेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता. तेथे शरद पवार प्रचाराला गेले नसून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच प्रचार करत होते, असे म्हणत पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य केलं. तसेच प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिल्याचीही आठवण पवार यांनी सांगितली. ईशान्य मुंबईत आम्ही उभा केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकरांच्या पक्षाने निलम गोऱ्हेंना उभं केलं. त्यावेळी, याचा लाभ भाजप नेते प्रमोद महाजन यांना झाला होता. त्यामुळे भाजपला मदत करण्याची कामगिरी करणाऱ्यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असा टोला पवार यांनी आंबेडकरांना लगावला. मुंबईतील एका कार्यक्रमावेळी पवार यांनी आंबेडकरांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले.
काँग्रेस चालेल, पण राष्ट्रवादीसोबत कधीच युती नाही, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले 'हे' कारण
दरम्यान, एकवेळ काँग्रेसोबत जाऊ पण राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नसल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हटले होते. तसेच शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असून राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्ष नाही. कारण, राष्ट्रवादीची पिलावळ भिडेंना मदत करत असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.