मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपाला आडमार्गाने मदत करत असतात. आडमार्गाने जाण्यापेक्षा त्यांनी थेटच भाजपाला पाठिंबा द्यावा. दलित समाजाला त्याचा फायदाच होईल. आपण दोघे मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकद वाढवू, अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अॅट्रॉसिटी, भारिप आणिं एमआयएम आघाडीवर भाष्य केले. भारिप आणि एमआयएमच्या आघाडीमुळे निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. या आघाडीमुळे भाजपाचाच फायदा होणार असल्याचा दावा शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला होता. रामदास आठवले यांनीही हीच भूमिका मांडत आंबेडकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपला लढा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात असल्याचे वारंवार सांगत आहेत. अशावेळी आठवले यांनी मात्र प्रकाश आंबेडकर हे नेहमीच आडमार्गाने भाजपाला मदत करतात असा दावा केला. एमआयएमबरोबर आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाचा भाजपालाच फायदा होणार आहे. त्यामुळे काँग्रेसनेच या नव्या आघाडीची चिंता करावी, असे आठवले म्हणाले. एमआयएमबरोबर जाण्यापेक्षा भाजपाबरोबर आल्यास दलितांना फायदा होईल, असे मत ही आठवलेंनी व्यक्त केले.सरकार भाजपाचे असो वा कॉंग्रेसचे दलितांवर अत्याचार होत आहेत हे वास्तव आहे. दलित सवर्णांमध्ये एकोपा व्हावा यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. अनुसूचित जाती, जमाती विरोधी कायदा (अॅट्रॉसिटी) ची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याची गरज आहे. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात कोणताही बदल होणार नसून तशाप्रकारची मागणीही कुठल्या समाजाने करू नये , असे आवाहनही आठवले यांनी केले. दलितांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी अॅट्रॉसिटीच्या विरोधातील संघटनांबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगतानाच दलित समाजातील कोणीही अॅट्रॉसिटीचा गैरफायदा घेऊ नये, असे आवाहनही आठवले यांनी केले.
प्रकाश आंबेडकर आडमार्गाने भाजपाला साथ देतात - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:55 PM