प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:11 PM2024-02-02T17:11:42+5:302024-02-02T17:53:31+5:30

वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार असली तरी जागावाटपाचा गुंता आणखी वाढू शकतो.

Prakash Ambedkar to propose these 6 Lok Sabha seats to mahavikas aghadi | प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जागांचं वाटप करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज पहिल्यांदाच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार असली तरी जागावाटपाचा गुंता आणखी वाढू शकतो. कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ६ जागा लढवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी इच्छुक असल्याचे समजते. 

वंचित बहुजन आघाडीकडून मविआला सहा जागांचा प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अकोला, अमरावती, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी या पाच जागांचा समावेश असून सहाव्या जागेबाबत अद्याप निश्चिती नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी या सहा जागांची मागणी केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मित्रपक्ष या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मविआच्या जागावाटपाचं गणित अंतिम टप्प्यात?

मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याचे समजते. मात्र उर्वरित १४ जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे. 

कोणत्या जागांवर तिढा कायम?

२०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचं गणित अद्याप निश्चित झाल्याचं दिसत नाही. ज्या १४ जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही त्यामध्ये वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Web Title: Prakash Ambedkar to propose these 6 Lok Sabha seats to mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.