मुंबई - केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनेमहाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. यामध्ये बसेस, एसटी बाहेर पडल्या नाहीत, कुलाबा, भायखळा, हाजीअली बंद आहे. जवळपास ९० टक्के बंद यशस्वी सुरु आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कुटुंब जसं आर्थिक परिस्थितीत अडकलं तर त्याला नामुष्की येते तसं देशाची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारचे ८ ते ९ लाख कोटी कमी होणार आहे. त्यामुळे सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यांना जाग आणावी, देशाचं नाक कापलं जाणार नाही याची दक्षता घेतली, लोकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं अन्यथा सरकार मनमानी पद्धतीने वागेल असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून ताब्यात घेणं सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत १५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कुठेही हिंसक आंदोलन होणार नाही ही खात्री आहे असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. हिंसक आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते नाही, भाजपा-आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन हिंसक करण्याचा डाव आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांना शोधून कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
दरम्यान, सोलापूरात काँग्रेस, एमआयएमचे कार्यकर्तेही बंदमध्ये सहभागी झाले आहेत. काही भागात हिंसक वळण लागलं आहे, बाळीवेस येथे सिटी बसवर दगडफेक करण्यात आली. ठाण्यातही वंचितच्या कार्यकर्त्यांनी तिन हात नाका येथे रास्ता रोको केला. पुण्यात बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे तर जनजीवन सुरळीत सुरु असल्याचं दिसून येत आहे.