मीरा रोड - मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रकाश दुबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुबोले हे माजी मंत्री गणेश नाईक यांचे कडवे समर्थक मानले जातात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुबोले यांची मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे अखेर ११ महिन्यांनी राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष मिळाला आहे .
मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी जून २०१७ मध्ये पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता . तेव्हा पासून हे पद रिक्त होते . पाटील यांच्यासोबत नाईक समर्थक ध्रुवकिशोर पाटील यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाची वाट धरली. प्रकाश दुबोलेदेखील काँग्रेसमध्ये गेले व तेथून उमेदवारी मिळवली. पण स्थानिक सहकारी उमेदवाराशी न पटल्याने दुबोले पुन्हा राष्ट्रवादीत आले.
स्वतःला शरद पवार यांचे समर्थक म्हणवणारे व त्यांच्या आशीर्वादाने महामंडळाचे अध्यक्षपद मिळालेले आसिफ शेख यांनीदेखील भाजपाची कास धरली . दुसरीकडे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली. मीरा भाईंदर राष्ट्रवादीत फाटाफूट होत असताना नाईक यांना स्वतःच्या कट्टर समर्थकांना थांबवणेदेखील जमले नाही .
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकादेखील राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्षाविनाच लढवल्या. जिल्हाध्यक्ष पदासाठी नाईक समर्थक माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, संतोष पेंडुरकर, संतोष गोळे, नामदेव इथापे, साजिद पटेल, रमझान खत्री, विनोद जाधव, गुलामनबी, पौर्णिमा काटकर असे 9 जण इच्छुक होते. नवी मुंबई येथे इच्छुकांची बैठक माजी मंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती. त्यावेळी पडत्या काळात देखील जे पक्षासोबत राहिले, त्यांच्याच नावाचा जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार करावा, असा सूर बहुतांशी इच्छुकांनी लावला होता . त्यांचा रोख दुबोले यांच्यावरच होता .
पुढे जिल्हाध्यक्ष पदासाठी दुबोले, पेंडुरकर, गोळे व इथापे हे चौघेच इच्छुक राहिले. त्यांची नावे प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती. परंतु जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक न होता गणेश नाईक यांच्या शिफारसीनुसार दुबोले यांची नियुक्ती मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीत दुबोले यांचा समावेश आहे .
दुबोले हे १५ वर्ष स्वीकृत नगरसेवक होते. ते नाईक कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दुबोले यांच्या नियुक्तीमुळे ११ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मीरा भाईंदर राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. एकेकाळी मीरा भाईंदर मध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे व पक्ष संघटना टिकवण्यासह ती वाढवण्याचे मोठे आव्हान दुबोले यांच्यासमोर आहे .