यदु जोशी
मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यासारख्या ज्येष्ठाला एका इमारत पुनर्विकास प्रकरणात मंत्रिमंडळातून डच्चू देण्याऐवजी त्यांना आधीच राजीनामा द्यायला सांगितले जाऊ शकते. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. मेहतांवरील आरोपांवरून विधिमंडळाच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी होऊ नये यासाठी हालचाली सुरू आहेत.
दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकासात विकासकाला झुकते माप मिळेल, अशा पद्धतीने मेहता यांनी निर्णय घेतला आणि ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ असा शेरा परस्पर लिहिल्याच्या प्रकरणाने वादळ निर्माण झाले. या प्रकरणी लोकायुक्तांच्या चौकशी अहवालात मेहतांवर ताशेरे ओढल्याचे म्हटले जाते. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या नाउमेद काँग्रेस-राष्ट्रवादीला मेहतांचा मुद्दा अधिवेशनात आयताच मिळाला आहे. विरोधकांच्या मागणीनंतर मेहतांनी राजीनामा दिला तर त्यांच्यावरील आरोप सरकारला मान्य असल्याचे एकप्रकारे दिसेल. तसे होऊ नये म्हणून मेहताच आधी राजीनामा देतील, असे म्हटले जाते. अधिवेशनापूर्वी मेहतांनी राजीनामा दिला तर सरकारची कोंडी करण्याचा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांकडे राहणार नाही.सहा वेळा आमदार असलेले प्रकाश मेहता हे मुंबई भाजपमधील मोठे नाव आहे. गुजराती समाजाचे असलेले मेहता यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांना कथित गैरव्यवहारप्रकरणी डच्चू देणे हे त्यांच्यासाठी मानहानीकारक असेल. त्याऐवजी त्यांनीच मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेच्या दरबारात मी आपले निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा पर्याय दिला जाऊ शकतो. मेहता यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही.राष्ट्रवादीची निदर्शनेराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मलबार हिल येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर शनिवारी जोरदार निदर्शने केली. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांना रोखण्यास पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.