मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मेहता चांगलेच गोत्यात आले आहेत. विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, लोकायुक्तांचा अहवाल आला असून याच अधिवेशनात त्याबाबतचा कृतीअहवाल सभागृहात मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड इथल्या एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. एसडी कॉर्पोरेशन या विकासकाला फायदा देण्यासाठी मेहता यांनी नियमबाह्य पद्धतीने एफएसआय अन्यत्र वापरण्यास मंजुरी दिल्याचा आरोप आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लोकायुक्त एम. एल. ताहलीयानी यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. लोकायुक्तांनी आपल्या अहवालात मंत्री मेहता यांच्या कारभारावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगतच केले नसल्याचे आता चौकशीत समोर आले आहे. तसेच त्यांनी आपली जबाबदारी देखील निष्पक्षपणे पार पाडली नसल्याचा ठपका लोकायुक्तांनी चौकशी अहवालात ठेवला आहे. या प्रकरणी मेहतांचा कारभार पारदर्शी नाही. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू होण्याआधीच त्याला स्थगिती दिली. मात्र या निर्णय प्रक्रियेत मेहता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी निर्णय घेतल्याचे मतही लोकयुक्तांनी व्यक्त केल्याचे समजते.
येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर १७ जुनपासून राज्य सरकार विधिमंडळाच्या आपल्या शेवटच्या अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. अशावेळी मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याचे वृत्त आल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रकाश मेहतांच्या अहवालाचा आधार घेत विरोधकांकडून अन्य मंत्र्यांवरील आरोपांचाही पुनरूच्चार केला जाण्याची शक्यता आहे.
कामकाज चालू देणार नाहीलोकायुक्तांच्या अहवालाने सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडले आहे. आतातरी मेहतांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारावा. अन्यथा १७ जूनपासून सुरू होणाºया पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, भ्रष्टाचाराचे थैमान घालणाºया १६ मंत्र्यांच्या गैरकारभारातील सत्य हळूहळू बाहेर येईल, असेही मुंडे म्हणाले.अदृश्य शक्तींचा शोध घ्यावा लागेल - प्रकाश मेहताज्या सुत्रांच्या हवाल्यातून बातमी आली आहे. ते सुत्र खरे आहे का, यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे, याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न आहे. दोन वर्षे केवळ सुत्रांच्या हवाल्याने या मुद्दयावर विरोधक आरोपबाजी करत आहेत. सभागृहात याबाबत सर्व माहिती सादर केली आहे. अहवाल आल्यावर याबाबत अधिक भाष्य करता येईल, असे मेहता यांनी ‘लोकमत’ला सांइगतले.