प्रकाश, पंकज यांची घोडदौड
By Admin | Published: April 4, 2015 05:45 AM2015-04-04T05:45:51+5:302015-04-04T05:45:51+5:30
माजी सार्क विजेता प्रकाश गायकवाड, माजी जागतिक विजेता योगेश परदेशी आणि अग्रमानांकित खेळाडू पंकज पवार यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना
मुंबई : माजी सार्क विजेता प्रकाश गायकवाड, माजी जागतिक विजेता योगेश परदेशी आणि अग्रमानांकित खेळाडू पंकज पवार यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. त्याचवेळी माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश डांगळेला मात्र विजयासाठी कडव्या लढतीस सामोरे जावे लागले.
महाराष्ट्र कॅरम संघटना आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करी रोड येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत योगेश परदेशीने एकहाती वर्चस्व राखताना मुंबई उपनगरच्या सुरेश कोळीला कोणतीही संधी न देता २५-०, २५-० असे लोळवले. पुण्याच्या प्रकाशनेदेखील एकतर्फी विजय मिळवताना मुंबईकर नितीन जानकोळीला २५-०, २५-६ असे नमवले. दुसऱ्या बाजूला अव्वल खेळाडू पंकजने आपला हिसका दाखवताना मुंबईच्या हेमंत कासारेचा २५-१०, २५-० असा धुव्वा उडवला.
त्याचवेळी माजी राष्ट्रीय विजेत्या योगेशला मात्र विजयी आगेकूच करण्यासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. रायगडच्या उत्तम गोरेगावकर विरुद्ध २५-४, ११-२५, २५-० असा झुंजार विजय मिळवताना योगेशने आगेकूच केली. अन्य एका तीन गेममध्ये रंगलेल्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने सर्वांचे लक्ष वेधताना मुंबई उपनगरच्या सुरेख पंडितचे २५-१, ०-२५, २५-१२ असे आव्हान संपुष्टात आणले. रायगडच्या तेजस दिवेकरनेदेखील तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात बाजी मारताना ठाण्याच्या कुणाल राऊतला २५-१९, १९-२५, २५-६ असा धक्का दिला. त्याचवेळी माजी आशियाई विजेत्या बलाढ्य हिदायत अन्सारीने अपेक्षित आगेकूच करताना मुंबईच्या विजय दळवीचा २५-०, २५-१० असा चुराडा केला. (क्रीडा प्रतिनिधी)