मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, यात राष्ट्रीय आणि राजकीय मुद्दे होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचीही त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची माहिती दिली. या भेटीत राव यांच्यासमेवत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेताही सोबत होता, याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अभिनेता प्रकाश राज हे लोकसभा 2019 च्या निवडणुकांपूर्वीपासूनच राजकारणात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळाल. अनेकवेळा जाहीरपणे त्यांनी केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. त्यामुळेच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते अपक्ष उमेदवार होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही ते राजकीय-सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहेत. या कालावधीत त्यांनी सरकारविरोधी आंदोलनांमध्येही सहभाग नोंदवला. तर, सोशल मीडियातूनही ते सातत्याने निर्भीडपणे, स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असतात.
प्रकाश राज हे मूळ कर्नाटकचे असले तरी, तेलुगू सिनेसृष्टीत त्याचा चांगलाच दबदबा आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीतील आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे ते लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळेच, मुख्यमंत्री के. चद्रशेखर राव यांच्यासमवेत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. प्रकाश राज तिथं येऊन त्यांना भेटले. त्यानंतर सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. तेथून ते पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले. त्यामुळे, राव यांच्यासमवेतच्या दौऱ्यात ते सोबत होते.
प्रकाश राज यांचा शरद पवार यांच्यासमवेतच्या बैठकीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, ते मुख्यंत्र्यांसह सर्वाचं स्वागत करताना दिसत आहेत. त्यात, प्रकाश राज हेही दिसून येतात.
विशेष म्हणजे शरद पवार यांचा हात आपल्या हातात घेतल्याचा राज यांचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, प्रकाश राज आणि शरद पवार यांच्या जवळीकतेचा अंदाज लावता येईल. त्यामुळे, राव-पवार भेटीत प्रकाश राज लक्षवेधी ठरले आहेत.
पवार भेटीनंतर काय म्हणाले राव
पत्रकारांशी बोलताना के. चंद्रशेखर राव म्हणाले की, 'तेलंगाणाला वेगळे राज्य बनवण्यासाठी जे आंदोलन झाले, त्यावेळीस शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. सर्वात आधी त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. आपला देश सध्या अतिशय बेरोजगारीकडे जात आहे. बेरोजगारी आणि गरिबी वाढत आहे आणि विकास कमी होत आहे.' काय म्हणाले शरद पवार
बैठक वेगळ्या विषयावर होती. राजकीय चर्चा फार झाली नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि इतर मुद्दे यातून बाहेर कसे पडता येईल यावर आम्ही बोललो. आता आम्ही इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत. सर्वांचे मत जाणून घेतल्यावर संयुक्त बैठक घेऊन अजेंडा मांडू.शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पुढची बैठक कुठे?
उद्धव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राव यांनी भाजपेतर पक्षांच्या नेत्यांची बैठक हैदराबाद येथे होईल, असे सांगितले. पवार यांच्याशी भेटीनंतर मात्र त्यांनी अशी बैठक बहुदा बारामतीत होईल, असे सांगितले.
राव यांनीही काँग्रेसला ठेवले दूर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असत्या शिवसेना व राष्ट्रवादीच्याच नेत्यांना भेटल्या होत्या. राव यांनीही तेच केले. काँग्रेसला वगळून भाजपला पर्याय देता येऊ शकेल, असे वाटते का या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी आम्ही सगळ्यांशीच चर्चा करणार आहोत, एवढेच सांगितले.