मुंबई, दि. 19 - थ्री इडियट्स चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला एक सीन आठवत असेल ज्यामध्ये शर्मन जोशीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यानंतर आमीर खान त्यांना बाईकवरुन रुग्णालयात घेऊन जातो. अशीच एक घटना मुंबईतही समोर आली आहे, पण येथे हार्ट अटॅक आल्यानंतर तोच व्यक्ती बाईक चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि आपला जीव वाचवला. मेडिकल मंत्राने दिलेल्या माहितीनुसार, हार्ट अटॅक आल्यानंतर एका तासाच्या आत उपचार सुरु होणं गरजेचं असतं. याला गोल्डन अव्हर असं म्हटलं जातं. माझगाव भागातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय एका हॉटेल मॅनेजरला हार्ट अटॅक आल्यावर गोल्डन अव्हरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यांचा जीव वाचला.
हार्ट अटॅक आल्याची माहिती मिळताच जसलोक रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती असल्याने त्यांनी थेट बाईक चालवतच रुग्णालयात जायचं ठरवलं. 17 ऑगस्टची ही घटना आहे.
छातीत कळा येत असल्याने जवळच्या रुग्णालयात जाऊन इसीजी काढण्यात आला. यानंतर हृदयविकाराचा झटका असल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांनी तात्काळ जसलोक रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र यावेळी जर गाडीने किंवा अॅम्ब्युलन्सने निघालो तर वाहतूक कोंडीत अडकू अशी चिंता सुरु झाली. मग त्यांनी थेट बाईकवरुन पोहोचण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयात आधीच आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांनी घेतलला निर्णय योग्य ठरला आणि वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच उपचारांना सुरुवात झाली. सध्या ते सुखरुप आहेत.
राज्य सरकारनेही रुग्णांना वेळेत सेवा मिळावी यासाठी काही दिवसांपुर्वी बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचं उद्घाटन केलं आहे. ही बाईक अत्यंत आधुनिक असून यामध्ये गरजेच्या सर्व सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथोमपचारासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असतो.
'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य आहे. याआधी गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईपुरती मर्यादित असणारी ही 'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा कालांतराने संपुर्ण राज्यभर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे.