प्राणिमित्र संघटनेचे खंडणीबहाद्दर अटकेत
By admin | Published: July 31, 2014 01:11 AM2014-07-31T01:11:16+5:302014-07-31T01:11:16+5:30
२६ जून रोजी रात्री संतोष दुबे आणि त्याच्या साथीदारांनी सोलापूर येथून मुंबईत मांस घेऊन येणारा एक ट्रक नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांना पकडून दिला होता.
मुंबई : मांसविक्रीचा धंदा बंद पाडण्याची धमकी देत घाऊक मांसविक्रेत्याकडून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला मुख्य सूत्रधार संतोष ऊर्फ सतीश दुबे आणि शैलेश ऊर्फ राजू वेदक जोगेश्वरी येथील निस्वार्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या या प्राणिमित्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नवघर पोलिसांनी अटक केली.
२६ जून रोजी रात्री संतोष दुबे आणि त्याच्या साथीदारांनी सोलापूर येथून मुंबईत मांस घेऊन येणारा एक ट्रक नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांना पकडून दिला होता. त्या प्रकरणात या संस्थेचा सचिव संतोष दुबे हा फिर्यादी होता. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवैधरीत्या प्राण्यांची कत्तल करून विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी गुलाम हसन कुरेशी यांना फोन करून यापुढील काळात मांसविक्रीचा व्यापार करायचा असल्यास एक लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. कुरेशी यांनी इतकी रक्कम देण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत दहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. आरोपींनी ती रक्कम घेऊन कुरेशी यांना मुलुंड येथील हॉटेल कॅम्पसमध्ये भेटण्यास बोलावले. दरम्यान, कुरेशी यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांनी सापळा रचून छगन मंगे लालजी आणि नितीन होले यांना अटक केली तर संतोष दुबे आणि शैलेश वेदक फरारी झाले होते. आज सकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ११ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.(प्रतिनिधी)