गणेशोत्सवात प्रसाद, मिठाईवर एफडीएची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 01:30 AM2019-08-29T01:30:37+5:302019-08-29T01:30:42+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडून हे पदार्थ साठवून ठेवले जातात.
मुंबई : गणेशोत्सवात प्रसाद, मोदक आणि मिठायांमधून भाविकांना विषबाधा व अन्नबाधा होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासना(एफडीए)ने सर्वच मिठायांवर तसेच इतर अन्नपदार्थांवर करडी नजर ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवापासून नवरात्र, दिवाळी ते नाताळपर्यंत अर्थात, डिसेंबर महिनाअखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. या मोहिमेंतर्गत एफडीए विविध ठिकाणी तयार होणारे पदार्थ योग्य रीतीने बनविले जातात का, याची तपासणी करेल, तसेच गणेश मंडळांना अन्नसुरक्षेचे धडेही दिले जाणार आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, खवा, मावा, पेढे इत्यादी प्रकारची मिठाई तयार करताना, त्यामध्ये वापरण्यात येणारे घटक नाशवंत असतात. अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडून हे पदार्थ साठवून ठेवले जातात. त्यांचा काही कालावधीनंतर वापर केल्याने संसर्ग वाढून त्यातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे या पदार्थांची योग्य प्रकारे तपासणी होणे गरजेचे आहे.
अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले नाहीत, तर त्यातून विषबाधा होऊन सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विविध ठिकाणी तयार होणारे पदार्थ तपासण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे.
‘अन्नसुरक्षेचे धडे गिरवणे अधिक गरजेचे’
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही प्रसाद व मिठाई तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, कोणती जबाबदारी घेतली तर प्रसाद आरोग्यदायी होऊ शकतो, याचे मार्गदर्शन एफडीए करणार आहे. वर्षभर एफडीए विविध पातळ्यांवर मार्गदर्शन करत असते. गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश मंडळांनी अन्नसुरक्षेचे धडे गिरवणे अधिक गरजेचे आहे, असे दराडे यांनी सांगितले.