Join us

Prasad Laad: 10 बाय दहाची खोली, हमाली करायचो; प्रसाद लाड यांनी विधीमंडळात जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 3:02 PM

''खरंतर एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मी मुलगा

मुंबई - भाजप नेते आणि आमदारप्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरु असून यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या एकूण 10 विधानपरिषदेच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. यासर्व सदस्यांना काल निरोप देण्यात आला. विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन करुन निरोप समारंभ झाला. त्यामुळे, प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत भाषण करताना आपला संघर्षमय प्रवास उलगडला. 

''खरंतर एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मी मुलगा. माझे वडिल माझगांव डाकमध्ये कामाला होते. दिवाकर रावते, सुभाष देसाईंसोबतचे तेव्हाचे 68 सालचे शिवसैनिक. एका 10 बाय दहाच्या खोलीत राहत होतो. कॉलेजला आल्यानंतर प्रेमप्रकरण सुरू झालं, माझ्या बायकोचे वडिल हे विधानपरिषदेचे सदस्य होते, बाबुराव बापसे. दोनवेळा ते विधानपरिषदेत होते, एकदा विधानसभेत. त्यावेळचा त्यांचा मुंबईतील रुबाब पाहायचो, तेव्हाच ठरवलं होतं की, आपण आमदार व्हायचं, असे प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले.  

पळून जाऊन केलं लग्न

मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. मग, मी टुरिस्टचा व्यवसाय करायला सुरुवात केली. सभापती महोदय हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतोय. मी सकाळी 4 वाजता टाइम्स ऑफ इंडियाला जायचो, टाईम्स ऑफ इंडियामध्ये मी हमाली करायचो. लोडिंग-अनलोडिंग व्हायची, खेमका नावाची एजन्सी होती. माझी टुरिस्ट गाडी मी सकाळी चालवायचो. त्या अर्ध्या तासाच्या लोडिंगमध्ये मला 70 रुपये त्यावेळेस मिळायचे. त्या 70 रुपयांतले 40 रुपये मी माझ्या बायकोला द्यायचो आणि 30 रुपयांत माझं विद्यार्थी दशेतलं राजकारण करायचो. त्यानंतर, माझी गाडी घेऊन मी बोरीवलीपर्यंत टाईम्स ऑफ इंडियाची मॅग्झिन ड्रॉप करत. मग, 9 वाजता किर्ती कॉलेजला यायचं. कॉलेज अटेंड करुन पुन्हा नेतागिरी करायची, असा आपला संघर्षमय जीवनप्रवास, राजकीय इतिहास प्रसाद लाड यांनी विधानसभेत सांगितला. 

1 लाख 35 हजारांपासून 1200 कोटींपर्यंतचा प्रवास

एका गाडीवरुन माझ्या 35 गाड्या झाल्या, संघर्षातून हे विश्व उभारलं. सन 2000 साली मी आणि माझ्या पत्नीने मिळून बांधकामाचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळेस, माझ्याकडे 1 लाख 38 हजार रुपये होते, त्यातून 35 लोकांचं पहिलं काम मला मिळालं होतं. आज 85 हजार लोकं माझ्याकडे काम करत आहेत, आणि माझा 1200 कोटींचा टर्नओव्हर आहे, असा आपला उद्योग क्षेत्रातील जीवनप्रवासच आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषेदत बोलताना सांगितला. 

टॅग्स :प्रसाद लाडआमदारशिवसेनाभाजपा