Join us  

"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:52 AM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला.

Prasad Lad on Ambadas Danve : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. राहुल गांधी यांनी हिंदुंचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करुन त्यांचा निषेध करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी मांडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना भरसभागृहात शिवीगाळ केली. यानंतर प्रसाद लाड यांनी आता अंबादास दानवे यांनी माझ्या आईची माफी मागावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेत्यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

विरोधीपक्षनेते राहुल गांधी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्ताव सभागृहात मांडला होता. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतली. त्यावरुन लाड आणि दानवे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी बोलताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली. दानवे यांनी लाड यांना थेट शिवीगाळ केल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर आता प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे.

"सभागृहामध्ये अंबादास दानवे यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या. या सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणाऱ्या नव्हत्या. माझी आई २५ वर्षापू्र्वी कर्करोगाने वारली आणि तिच्याबद्दल अपशब्द काढणे हे विरोधी पक्षनेत्याला किती योग्य वाटते याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली आहे का हा प्रश्न देखील मला विचारायचा आहे. या सगळ्या प्रकारानंतर मी किती शूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर बोट कापेन असे म्हणतात. या सगळ्या प्रकारावर मला भाष्य करायचे नाही. आम्ही देखील परळ, लालबागसारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला तिथे मोठे झाले आहोत. सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देणार नाही. पण या घटनेमनुळे रात्रभर झोपू शकलो नाही. ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या आईवरुन शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला दुःख देऊन गेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबतीत सांगितले. मी सभागृह, सरकार, उद्धव ठाकरे यांना आवाहन करतो आहे की याबाबत विरोधी पक्षनेत्यांना शिक्षा झाली पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन झाले पाहिजे. त्यांनी माझी नाहीतर माझ्या आईची जाहीर माफी मागितली पाहिजे," असे प्रसाद लाड यांनी म्हटलं. 

बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे - अंबादास दानवे

“विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटलेला नाही. मी एक शिवसैनिक आहे. जो माझ्यावर बोट दाखवेल, त्यांची बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. ज्या विषयाचा सभागृहाशी संबंध नाही, त्याविषयावर माझ्याकडे हातवारे करून ते बोलत होते”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. 

टॅग्स :विधानसभाप्रसाद लाडअंबादास दानवेउद्धव ठाकरे