Join us

दरेकरांप्रमाणेच प्रसाद लाड मुंबई बँकेत ‘श्रीमंत’ मजूर; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:45 AM

प्रसाद लाड स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत  कामगार असल्याचे दाखवून ‘पगारदार’ पतसंस्था प्रवर्गातून  मुंबई बँकेचे संचालक आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी   बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने अनेक मोठे घोटाळे केल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे.  दरेकरांप्रमाणेच मुंबई बँकेत आणखी तीन संचालक ‘श्रीमंत’ मजूर आहेत, तर प्रसाद लाड हे स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत  कामगार असल्याचे दाखवून ‘पगारदार’ पतसंस्था प्रवर्गातून  मुंबई बँकेचे संचालक आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी   बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी यांनी केली आहे. सहकार सुधार समितीच्या वतीने उटगी  आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे.  विश्वास उटगी म्हणाले की,   मुंबई बँकेचे संचालकपद मिळवण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे खोटे दस्तावेज दिले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात खोटे लिहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दरेकरांप्रमाणेच मुंबई बँकेत आणखी तीन संचालकांनी बोगस पुरावे देऊन मजूर प्रवर्गातून संचालक झाले आहेत. आनंदराव गोळे, विनोद बोरसे आणि विठ्ठल भोसले अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत, मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत. याशिवाय मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड यांनी तर वेगळीच क्लृप्ती लढविली आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत पगारदार नोकर असल्याचे दाखवून ते पगारदार नोकरांच्या पतसंस्था गटातून बँकेतून निवडून येतात. या सर्वांविरुद्ध मुंबई बँकेच्या निवडणुकीच्या वेळी सहकार सुधार समितीच्या लोकांनी सहकार निबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. चौकशीची मागणी केली होती. पण सहकार विभाग भ्रष्टाचाराने बरबटला आहे. त्यांनी तक्रारीची दखलही न घेता त्यावेळी सर्वांना पात्र उमेदवार म्हणून घोषित केले. चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असे ते म्हणाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकार विभागाला २०१५ ते २०१९ या कालावधीत सहा पत्रे पाठवली आहेत. त्यानंतर नाबार्डचा अहवाल आला आहे. त्यामध्ये सहकार विभागाच्या अनियमिततेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रसाद लाड हे संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या कंपनीला दीड टक्का कमी व्याजाने  कर्ज घेतले. त्यात बँकेचे ७८ लाखांचे नुकसान झाले. बँकेतील हा दोन हजार कोटींचा घोटाळा असून, आर्थिक गुन्हे विभागाने त्याची चौकशी करावी. - धनंजय शिंदे, राज्य सचिव, आम आदमी पक्ष

टॅग्स :प्रसाद लाडभाजपाआप