Join us

वंदे भारत ट्रेनच्या प्रवासात मिळणार मोदकाचा प्रसाद, आयआरसीटीसीकडून ४,५०० मोदकांची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:59 PM

Ganesh Mahotsav: संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या गणेशोत्सवात प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’ने जय्यत तयारी केली असून, राज्यात धावणाऱ्या पाचही वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई  - संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या गणेशोत्सवात प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’ने जय्यत तयारी केली असून, राज्यात धावणाऱ्या पाचही वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रवाशांना हा प्रसाद मिळावा, यासाठी आयआरसीटीसी साडेचार हजार मोदकांची ऑर्डर देणार असल्याचे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडक्या बाप्पाचे आगमन मंगळवारी होणार आहे. त्या निमित्ताने हॉटेल, मॉल्स सजले असून, गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांसाठी खस्ता कचोरी, पुरणपोळीही देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पाठोपाठ इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम महामंडळाने वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थांमध्ये उकडीचा मोदक देण्याचा निर्णय़ घेतला आहे. सीएसएमटी - शिर्डी, सोलापूर, मडगाव, नागपूर - बिलासपूर आणि मुंबई सेंट्रल - गांधीधाम या पाच वंदे भारत ट्रेनमध्ये उकडीचे मोदक देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीला साधारणतः साडे चार हजार मोदक लागणार आहेत. काही उकडीचे मोदक आयआरसीटीसी किचनमध्ये बनविण्याचे नियोजन आयआरसीटीसीकडून करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे प्रवाशांना मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देण्याचे  नियोजन आयआरसीटीसीकडून करण्यात येत आहे.

फक्त मंगळवारीच उकडीचे मोदक सध्या कोकण रेल्वे मार्गावर  सीएसएमटी - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर  मडगाव - सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवार, गुरुवार, शनिवार चालविण्यात येते. गणेश चतुर्थी मंगळवार, १९ सप्टेंबरला आहे. त्या दिवशी मडगावहून मुंबईकरिता वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेता येईल.

टॅग्स :गणेशोत्सववंदे भारत एक्सप्रेस