प्रसाद पुरोहित याचे हायकोर्टात अपील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:11 AM2018-03-15T05:11:32+5:302018-03-15T05:11:32+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणामधून आरोपमुक्तता करण्यास विशेष एनआयए न्यायालयाने नकार दिल्याने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणामधून आरोपमुक्तता करण्यास विशेष एनआयए न्यायालयाने नकार दिल्याने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष एनआयए न्यायालयाने २७ डिसेंबर रोजी पुरोहितसह साध्वी व अन्य आरोपींवरील मकोका हटविला आहे.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्तता करावी यासाठी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित व अन्य सहा आरोपींच्या वकिलांनी २०१६मध्ये विशेष एनआयए न्यायालयाला अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर निर्णय देताना २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, त्यांना अंशत: दिलासा देत न्यायालयाने या सर्वांची ‘मकोका’तून सुटका केली आहे.
त्यामुळे या सर्व आरोपींना बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील कलम १६ (दहशतवादी कृत्य करणे) आणि कलम १८ (फौजदारी कट) व भारतीय दंड संहिता कलम १२० ब (कट रचल्याबद्दल शिक्षा), ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि अन्य कलमांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत पुरोहितने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपिलावर लवकरच सुनावणी होणार आहे.