लोकमत न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमीवरील अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी आतापर्यंत रंगभूमीवर विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांची सामाजिक बांधिलकीही ठळकपणे दिसून आली. यातच अधिक मानाची गोष्ट म्हणजे, आता प्रशांत दामले यांची ‘वृद्ध कलावंत मानधन निवड समिती’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याची योजना शासनातर्फे राबवली जाते. त्याकरिता कलावंतांना मानधन मंजूर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येते. त्यायोगे मुंबई शहराकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले काम पाहणार आहेत. दरम्यान, प्रशांत दामले यांच्या या निवडीबद्दल नाट्यसृष्टीत समाधान व्यक्त केले जात असून, अनेक रंगकर्मींनी विविध माध्यमांद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रशांत दामले ही निवड सार्थ ठरवतील, अशी आशाही नाट्यसृष्टीत व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भातले पत्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून मला प्राप्त झाले असून, यानिमित्ताने ज्येष्ठ कलावंतांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत दामले यांनी त्यांच्या या निवडीविषयी बोलताना दिली.