प्रशांत दामले ‘कार्टी’च्या प्रेमात !

By Admin | Published: April 14, 2015 12:35 AM2015-04-14T00:35:12+5:302015-04-14T00:35:12+5:30

मराठी रंगभूमीवरचा चॉकलेट हीरो प्रशांत दामले याने गेल्या वर्षी नाटकातून विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Prashant Damle is in love with 'Karti'! | प्रशांत दामले ‘कार्टी’च्या प्रेमात !

प्रशांत दामले ‘कार्टी’च्या प्रेमात !

googlenewsNext

राज चिंचणकर ल्ल मुंबई
मराठी रंगभूमीवरचा चॉकलेट हीरो प्रशांत दामले याने गेल्या वर्षी नाटकातून विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याने नाटकातून थेट हिंदी मालिकेत घेतलेली उडी पचवणे त्याच्या चाहत्यांना कठीण गेले. पण रंगभूमीवर बरीच वर्षे काम करून आपले पक्के स्थान निर्माण केलेल्या नटाची रंगभूमीशी जोडली गेलेली नाळ अशी सहजासहजी तुटत नाही. प्रशांतच्या बाबतीतही हे खरे ठरले. त्याची पावले आता पुन्हा रंगभूमीकडे वळली असून, तो थेट कार्टीच्या प्रेमात पडला आहे.
प्रशांत दामले म्हणजे काहीतरी हटके, असे समीकरण पक्के असल्याने आता प्रशांत नक्की काय करणार याची उत्सुकता होतीच. पुनश्च हरिओम करताना प्रशांतने ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक स्वीकारले असून, नेहमीचे चॉकलेटीपण बाजूला सारत प्रशांत चक्क या नाटकातल्या मुलीच्या वडिलांची व्यक्तिरेखा रंगवत आहे. एवढेच नव्हे, तर यासाठी थेट त्याने मराठी मालिकेतल्या सूनबाईचा हात धरला असून, या नाटकात त्याला तेजश्री प्रधान साथ देत आहे. या नाटकाच्या निमित्ताने तेजश्रीचे रंगभूमीवर पदार्पणही होत आहे. रंगभूमीवर परतताना प्रशांतला या सूनबाईची आवश्यकता का भासली, हे तसे कोडेच आहे. पण त्याचा उलगडा करताना प्रशांत म्हणला, की सहा महिन्यांपूर्वी तेजश्रीसोबत बोलताना एखादा चांगला रोल असेल तर नाटक करायचे असल्याचे तिने सूचित केले होते. म्हणून या नाटकाबद्दल तिला विचारले असता तिने होकार दिला आणि आता आम्ही हे नाटक एकत्र करतोय. वसंत सबनीस लिखित हे नाटक यापूर्वी रंगभूमीवर येऊन गेले असले, तरी आता ते नव्या संचात पुन्हा येत आहे. आजचे आघाडीचे दिग्दर्शक मंगेश कदम या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, की प्रशांत आता त्याच्या वयाच्या अशा टप्प्यावर आहे की त्याने त्याला सूट होईल अशी भूमिका केली पाहिजे, असे माझ्या मनात होते. ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक आहे आणि प्रशांतने नेहमीचीच विनोदी बाज असलेली नाटके करण्यापेक्षा काही वेगळे केल्यास त्याच्या चाहत्यांना ते जास्त आवडेल, याची मला खात्री आहे.

यापूर्वी मोहन जोशी व स्वाती चिटणीस यांनी केलेले हे नाटक मी जेव्हा पाहिले, तेव्हाच कधीतरी हे नाटक आपण करायचेच, हे मनात ठरले होते. यातल्या वडिलांच्या भूमिकेसाठी माझे आताचे वय अगदी फिट्ट आहे. वसंत सबनीस यांनी हे नाटक उत्तम बांधले असून, त्यात उत्तम दर्जाचा विनोद आहे. रंगभूमीवर परत येताना मला असेच नाटक हवे होते. आता पुन्हा एकदा मी त्याच जोमाने रंगभूमीवर येतोय.
- प्रशांत दामले

Web Title: Prashant Damle is in love with 'Karti'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.