Join us

प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ने मारली बाजी, नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 9:00 AM

Prashant Damle: अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’ने बाजी मारली आहे.

मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’ने बाजी मारली आहे. रंगकर्मी नाटक समूहाचे मुंबईमध्ये आठ उमेदवार विजयी झाले आहेत, तर माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’चे मुंबईत केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीचा अधिकृत निकाल १९ एप्रिल रोजी घोषित करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या एकूण ६० जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ४० जागांसाठी या निवडणुकीत मतदान करण्यात आले. निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील साहित्य संघ मंदिर आणि यशवंत नाट्यगृह या दोन केंद्रांवर केवळ २५ टक्के मतदान नोंदवले गेले. 

ठाण्यात शिवाजी शिंदे, विजय चौगुले, संदीप जंगम, धुळ्यात चंद्रशेखर पाटील, बीडमध्ये दीपा क्षीरसागर व संजय पाटील देवळणकर, नगरमध्ये संजयकुमार दळवी, क्षितिज झावरे, सतीश लोटके यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. मुंबईतून अनिल कदम, मंगेश कदम, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, दिलीप जाधव, सुनील देवळेकर, प्रमोद पवार, राजन भिसे, राहुल भंडारे, प्रभाकर वारसे, विजय सूर्यवंशी पराभूत झाले. रायगडमध्ये श्यामनाथ पुंडे, रत्नागिरीत समीर इंदुलकर बिनविरोध निवडून आले आहेत.

कांबळींच्या मतांची फेरमोजणी?मतांची नोंदणी करताना चुका झाल्याचा आक्षेप घेत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहातील निर्माते दिलीप जाधव यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची फेरमतमोजणी केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे अधिकृत निकाल लांबण्याची शक्यता आहे.

मुंबईतून रंगकर्मी नाटक समूहाचे प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४),  सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१), सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे (५९०), तर आपलं पॅनलचे सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७) आणि प्रसाद कांबळी (५६५) विजयी झाले आहेत. उपनगरातून आपलं पॅनलच्या ऐश्वर्या नारकर (४०८) व अविनाश नारकर (४०७), तर रंगकर्मी नाटक समूहाचे संजय देसाई (३८१) व उदय राजेशिर्के (३७०) विजयी झाले आहेत. 

टॅग्स :प्रशांत दामलेमहाराष्ट्र