होऊन जाऊ दे युती... 'चाणक्य' प्रशांत किशोर यांनी सांगितली जागावाटपाची 'युक्ती'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:02 PM2019-02-05T19:02:35+5:302019-02-05T19:10:37+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना-भाजपाची युती होण्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना-भाजपाची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाणक्य म्हणून ओळख असलेले जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर राज्यात शिवसेना-भाजपाच्या युतीसाठी प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशांत किशोर यांनी मंगळवारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत प्रशांत किशोर यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याचा सल्ला दिला असून राज्यात 24-24 या फॉर्म्युल्याने युती झाली तर काय हरकत आहे, असेही म्हटल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीत हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.
दुसरीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. युतीची चर्चा सुरू नाही. युतीसाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणुकांची रणनिती आणि समीकरणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत.'
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्याच मास्टर माईंडने पंतप्रधान मोदींच्या यशात मोलाची भूमिका बजावली होती. नरेंद्र मोदींना राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात प्रशांत किशोर यांचा महत्त्वाचा रोल होता. त्यांना नरेंद्र मोदींचे चाणक्य अशी नवी ओळख प्रशांत किशोर यांना मिळाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची साथ सोडून, नितीश कुमार यांना साथ दिली. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या प्रचार-प्रसाराची धुरा हाती घेतली होती. प्रशांत किशोर यांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून, त्यांनी नितीश कुमार यांची सत्ता टिकवून ठेवली. प्रशांत किशोर हे रणनीतीचे सौदागर म्हणून ओळखले जातात. बिहारच्या निवडणुकीनिमित्त त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत उपाध्यक्षपद भूषवले.