Join us

प्रताप भानू मेहता यांचा राजीनामा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक : भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रताप भानू मेहता यांनी अशोक विद्यापीठातील प्राध्यापक पदाचा दिलेला राजीनामा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रताप भानू मेहता यांनी अशोक विद्यापीठातील प्राध्यापक पदाचा दिलेला राजीनामा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर म्हणाले. सत्ताधारी पक्षाच्या न पटणाऱ्या भूमिकांवर व्यक्त केलेली नाराजी, टीका-टिप्पणीनंतर मेहता संस्थेशी संबंधित राहिल्यास अडचणीचे ठरेल, अशा स्पष्ट शब्दांत कळल्यावरच मेहतांनी राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.

मेहता जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले राजकीय भाष्यकार आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, विधि क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या सर्व भूमिका सर्वांना पटतील, असे नाही. त्यांची मते अंतिम मानण्याचे कारण नाही; परंतु त्यांचे विरोधी मतसुद्धा गांभीर्याने घेतले जाण्याइतपत महत्त्वपूर्ण असते. ओबीसींना उच्चशिक्षण क्षेत्रात २७ टक्के राखीव जागा ठेवण्याच्या युपीए सरकारच्या धोरणाशी असहमत झाल्यामुळे त्यांनी नॅशनल नॉलेज कमिशनच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. त्याबाबत आम्हा दोघांचे टोकाचे मतभेद होते. अलीकडे त्यांनी अशोक विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा राजीनामा दिला होता. प्रा. मेहता यांच्यासारख्या लोकांना सत्ताधाऱ्यांनी शत्रू न मानता त्यांच्या मतांचा उपयोग आपल्या भूमिकांचे मूल्यमापन करण्यासाठी करायला हवा, असे मुणगेकर म्हणाले.

त्यांच्यानंतर भारताचे मुख्य माजी आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही अशोक विद्यापीठाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आर्थिक धोरणांबाबत विद्यमान सरकारशी त्यांचेही काही मतभेद आहेत. ते मांडायचेच नाहीत काय, असा प्रश्नही मुणगेकर यांनी केला.