मुंबई/ ठाणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मंगळवारी सकाळी छापे मारले. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने प्रताप सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र ईडीचे पथक जेव्हा सरनाईकांच्या घरी आले, तेव्हा त्यांनी नाष्टा आणि जेवण केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, माझ्या तसंच मुलांच्या घरी आणि ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. जेवण केलं. तसेच चार- पाच वेळा चहा देखील घेतला. ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. मात्र देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी दिलं.
तत्पूर्वी, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
विहंग सरनाईकांवर प्रश्नांची सरबत्ती
प्रताप सरनाईक यांचे पुत्र व टॉप ग्रुपचे संचालक असलेल्या विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेले. त्यांच्याकडे व्यवसाय आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीबद्दल विचारणा करण्यात आली. बँक खाती आणि त्यावरील व्यवहारांबद्दल त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे.
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; संजय राऊत आक्रमक
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.
चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे.
ठाण्यातील नेत्यांची चुप्पी
प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत केंद्र सरकारचा समाचार घेतला. मात्र शिवसेनेचे सर्वोच्च नेते तसेच ठाण्यातील प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रताप सरनाईक यांची शिवसेना आता कशी पाठराखण करणार व कारवाई राजकीय हेतूने असल्यास त्यांना ती राजकारणात फलदायी ठरणार का, याची शिवसैनिकांत उत्सुकता आहे.