Join us

प्रताप सरनाईक यांची आठ कोटींची फसवणूक; पैसे घेऊनही जमीन नावावर केली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 6:28 AM

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि  बांधकाम व्यावसायिक प्रताप सरनाईक यांची ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

मीरारोड :  शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि  बांधकाम व्यावसायिक प्रताप सरनाईक यांची ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे.

घोडबंदर भागातील जमीन खरेदीत ७ कोटी ६६ लाखांचा मोबदला घेऊनही मूळ जमीन मालकाने बँकेचे कर्ज फेडले नाही तसेच जमीन नावे करुन दिली नाही. मार्टिन अँलेक्स कोरिआ (रा. चिंचोली बंदर, मालाड) याने मौजे घोडबंदर सर्व्हे क्रमांक १९३ हिस्सा क्र. ९ ही ३०३० चौ. मीटर जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगितले. ही जमीन आपल्याला विक्री करायची आहे, असे असल्याचे सांगून आ. सरनाईक यांच्यासोबत विक्री करारनामा केला. 

मार्टिन याने वेळोवेळी जमिनीचा मोबदला म्हणून ४ कोटी १६ लाख इतकी रक्कम सरनाईक यांच्याकडून घेतली. त्या जागेवर असलेले भाडेकरू उदय मेहता, किशोर तलसानिया व दीपक कन्हैया यांनी ३ कोटी ५० लाख रुपये सरनाईक यांच्याकडून घेतले. करारातील अटीशर्ती प्रमाणे मार्टिन याने  सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचे १ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज फेडायचे होते. मात्र, मार्टिन यांनी सरनाईक यांच्याकडून जमिनीचा पूर्ण मोबदला घेतला पण कर्ज फेडले नाही. 

जमिनीवर बँकेचे कर्ज

मार्टिन याने कर्ज फेडण्यास तसेच जमीन सरनाईक यांच्या नावावर करण्यास टाळाटाळ केल्याने सरनाईक यांचे स्वीय सहायक शिवाजी नाळे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर काशिमीरा पोलिसांनी मार्टिन विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे शुक्रवारी देण्यात आला असून  सहायक पोलिस आयुक्त भास्कर पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक पानमंद हे तपास करत आहेत.

टॅग्स :धोकेबाजीमुंबईपोलिस