प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:05 AM2021-06-21T04:05:22+5:302021-06-21T04:05:22+5:30
मोदी-ठाकरे भेटीनंतर लिहिलेले पत्र वर्धापन दिनानंतर उघड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ...
मोदी-ठाकरे भेटीनंतर लिहिलेले पत्र वर्धापन दिनानंतर उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामुळे रविवारी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशीचे हे पत्र दहा दिवसानंतर शिवसेना वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमात आले. वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी ८ जूनला राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र, मोदी - ठाकरे यांच्यात बंद खोलीत स्वतंत्र चर्चाही झाल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ जूनला सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिल्याचे पत्रावरील तारखेवरून दिसते. शिवाय, मुख्यमंत्री कार्यालयाने १० जूनला पत्र मिळाल्याची पोच दिल्याचाही शिक्का पत्रावर आहे. पत्रातील मजकूर हा प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा आणि पक्षप्रमुखांना संबोधित करणारा आहे. असे असूनही मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून त्याची पोचपावती घेण्यात आली.
मोदी-ठाकरे भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वबळाची भाषा सातत्याने केली गेली. त्यावर स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील, असा तिखट हल्ला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणात केला. वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी सरनाईकांचे दहा दिवस जुने पत्र माध्यमात आले. पत्र बाहेर येण्याच्या टायमिंगवरूनही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सरनाईक यांनी आपल्या पत्रात एकीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळतानाच महाविकास आघाडीच्या प्रयोगाने शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा मुद्दा मांडला. भाजपसोबतच्या वितुष्ठामुळे आपल्या कुटुंबामागे चौकशीचा ससेमिरा लागला. अशीच परिस्थिती मंत्री अनिल परब आणि आमदार रवींद्र वायकर यांची आहे. राज्यात सत्ता असूनही कसलीच मदत झाली नाही. या लढ्यात एकाकी पडल्याची भावनाही सरनाईक यांनी मांडली आहे.
* ‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू!
शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क साधून ‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची स्वबळाची भाषा आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी अशाच सुरू राहिल्यास शिवसेना वेगळा विचार करू शकते, असा इशाराही या पत्राच्या माध्यमातून दिला गेल्याचे म्हटले जात आहे.
----------------------------------------