पोलीस असल्याचे भासवून तरुणीसोबत लग्नाचा डाव, साता-याच्या शेतक-याचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:42 AM2017-09-01T01:42:19+5:302017-09-01T01:43:39+5:30
पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील तरुणीशी लग्नाचा डाव मांडणा-या साता-यातील शेतक-याच्या बनावाचा ताडदेव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
मुंबई : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील तरुणीशी लग्नाचा डाव मांडणा-या साता-यातील शेतक-याच्या बनावाचा ताडदेव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संतोष इंगळे (३५) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला फसवणूक, विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याने राज्यातील तरुणींसोबतही असेच कृत्य केले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ताडदेव परिसरात २६ वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. ती एका खासगी कंपनीत काम करते. तिने काही विवाह संस्थांमध्ये लग्नासाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये तिने तिची संपूर्ण माहिती दिली होती. गेल्या वर्षी इंगळेने फेसबुकवरून तिच्याशी संपर्क केला. तिच्याशी ओळख करत तिला लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता, आपण पोलीस अधिकारी असून मुंबई, पुणे अशा विविध भागांत कार्यरत असल्याची माहिती दिली. त्याने त्याची माहिती फेसबुकवरूनच शेअर केली. तिने याबाबत कुटुंबीयांना सांगितले. पोलीस खात्यातील मुलगा असल्याने कुटुंबीयही खूश होते.
दोघांमध्ये संवाद वाढला. मात्र हळूहळू तिला इंगळेच्या वागणुकीवर संशय आला. त्यात तो पोलीस नसल्याचे समजताच तिने त्याच्याशी संपर्क तोडला. मात्र तरीदेखील इंगळेने तिला फोनवरून शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. इंगळेच्या विचित्र स्वभावामुळे तरुणीने चार महिन्यांपूर्वी ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी इंगळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार, ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, पोलीस अंमलदार अडागळे, राठोड, सांगळे, कापसे यांनी तपास सुरू केला. तपासात आरोपी सातारा येथील असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, थोरात यांच्या पथकाने त्याला सातारा येथून बेड्या ठोकल्या. तपासात तो शेतकरी असल्याची माहिती समोर आली.
इंगळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. त्याने अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.